Saturday, 30 September 2017

मेथीचे आळण


मेथीचे आळण


साहित्य : एक जुड्डी मेथी ,एक वाटी मलईचे दही,चार चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा साखर,तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा मोहरी,चिमूटभर हिंग,अर्धा चमचा हळद,,चवीनुसार मीठ ,२-३ हिरव्या मिरच्या.
कृती : मेथी निवडून आणि स्वछ करून घ्या आणि बारीक चिरुन ठेवा.
गॅसवर एका एका कढईत तडका फोडणीसाठी तेल गरम करून  घेऊन त्यात मोहरी घाला व चांगली तडतडू द्या.
मग त्यात चिरलेली मेथी व हिरव्या मिर्ची चे तुकडे टाकून ती भाजी परता.
दुसरीकडे एका भांडयात दही घेऊन ते घुसळून घ्या. व त्यात बेसन टाकून छान मिक्स करा.(१:३ असे बेसन व दहयाचे प्रमाण घ्या)
मेथीची भाजी छान परतून घेतल्यावर त्यात हळद, तिखट, आणि मीठ व साखर घालून एखादे मिनिट परतून घेऊन मग  त्यात दही बेसनाचे मिश्रण घालून छान मिक्स करा.आपल्याला आळण जेवढे घट्ट किव्हा पातळ हवे असेल त्या नुसार पाणी घालावे. पण आळण कढ़ी पेक्षा जरा घट्टच हवे .
एका लोखंडी काढल्यात टेक गरम करून घ्या व त्यात भरपूर लसूण टाळून तो चांगला लालसर व  क्रिस्पी होउ द्या,मग त्यात सुक्की लाल मिरची, कढ़ीपत्ता, जीरे टाकून याचा तड़का या आळणा वर ओता.


कारल्याची भजी
साहित्य : दोन कारली , एक वाटी बेसन किंवा नाचणीचे  पीठ  , चिमूटभर हिंग , एक चमचा लाल मिरचीचे तिखट पूड अर्धा चमचा आमचूर पूड , चवीनुसार मीठ , एक चमचा  लिंबाचा रस , आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल
कृती : कारली चांगली धुवून घेऊन त्याच्या पातळ लांबट गोल चकत्या कापुन घ्या. ह्या चकत्यांना लिंबाचा रस आणि थोडे मीठ लाऊन १५- २० मिनिटे झाकून ठेवा. नंतर ह्या चकत्या पाण्याने २-३ वेळा नीट धुवा.
एका कढई मधे तेल तापवायला ठेवा. तेल तापेपर्यंत बेसांच्या किंवा नाचणीच्या पीठात हिंग, लाल मिरची पूड, मीठ, आमचूर पूड, पाणी टाकून भज्यांसाठी पीठ तयार करा. तेल गरम झाले की नाचणीच्या बनवलेल्या पिठात कार्ल्याचे काप बुडवून ही कारला भजी तेलात सोडावीत. ही भजी दोन्ही बाजुंनी २-३ मिनिटे चांगली तळून घ्या .
ही गरमागरम भजी कोणत्याही पातळ चटणी बरोबर किंवा साँस बरोबर सर्व्ह करा.
ही भजी डायबेटिस असलेल्या लोकांसाठी  छान आहेत.


खदखद्या (शिळा) भात

खदखद्या (शिळा) भात


शिळ्या भाताचा आम्ही खदखदया (काहीजण खुदखुद्या म्हणतात) भात करतो. साजूक तुपात जिर्‍याची फोडणी करायची, त्यात कढीपत्ता टाकायचा, चवीनुसार लाल सुक्या मिरच्या टाकायच्या. लसूण आणि आल्याचे तुकडे, किंचित मेथीदाणे आवडत असल्यास. मग त्यात भात टाकून ताक आणि थोडं पाणी टाकायचं आणि मेतकूट व मीठ घालायचं.आवडत असल्यास  ओवा आणि थोडी मिरपूड पण घाललेली चालते.

थोड्या वेळाने भात खदखदला की गॅस बंद करून  वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. (आवड असल्यास चवीपुरती साखर  घालावी) 

Saturday, 26 August 2017

झटपट आळूवड्यासाहित्य : ५-६ वड्यांच्या आळूची मोठी न खाजणारी आळूची पाने,दोन वाट्या बेसन पीठ,चवीनुसार लाल मिरचीचे तिखट,मीठ व चिंचेचा कोळ,एक छोटा चमचा हिंग,एक छोटा चमचा हळद व आळूवड्या शॅलो फ्राय करण्यासाठी लागेल तसे तेल.

कृती : झटपट आळूवडी करायची आसल्यास आळूची पाने बारीक बारीक (देठासकट) चिरुन त्यात बेसन पीठ,चवीनुसार लाल मिरचीचे तिखट,मीठ,चिंचेचा कोळ,चिमूटभर हिंग व हळद घालून वड्यांचे पीठ भिजवा,चव बघा व मगच त्या पिठाचे उंडे करून इडलीपात्रात किंवा कुकरमधून ते उंडे उकडून घ्या.थंड झाल्यावर उंड्याच्या वड्या कापून घ्या. नंतर त्या डिप फ्राय किंवा शॅलो फ्राय करा. मस्त लागतात अश्या आळूवड्या चवीला..

आंबेहळदीची चटणीसाहित्य : अर्धा वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव,एक आंबेहळदीचा तुकडा , आल्याचा छोटा तुकडा,४ ५ लसुणपाकळ्या, २ हिरव्या मिरच्या , चविनुसार  मीठ , १ चमचा साखर , अर्या लिंबाचारस ,चटनिवर वरुन फोडणी देण्या दोन चमचे  तेल, ५-६ कढीपत्त्याची पाने  व एक चमचा मोहरी.

कृती --- तेल मोहरी व कढीपत्ता सोडुन वरिल सर्व साहीत्य मिक्सरच्या ग्राइंडरच्या भांड्यात  बारीक वाटून घ्यावे व वरून कढीपत्ता  आणि मोहरीची  फोडणी द्यावी , फोडणी ओतल्यावर २ मिनीटे चटणी वर झाकण ठेवावे. 

पौष्टिक अळीव पराठा

पौष्टिक अळीव पराठासाहित्य: प्रत्येकी अर्धी वाटी अळीव, ओलं खोबरं आणि बारीक रवा, दीड वाटी दूध, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, दोन चमचे तूप, चवीला मीठ, अर्धा चमचा जायफळ पावडर, दीड वाटी कणीक, तेल
कृती:एक वाटी दूध गरम करून त्यात अळीव भिजत घालावे. दोन तासाने तुपावर रवा भाजून घ्यावा, त्यात खोबरं, चिमूटभर मीठ, ळीवासकट दूध आणि उरलेलं दूध घालून रवा शिजवावा, त्यात गूळ घालून मऊ सांजा करावा, जायफळ घालावं.
कणकेमध्ये चवीला मीठ आणि एक मोठा चमचा तेल घालून सैलसर कणीक भिजवावी. थोडय़ा वेळाने कणकीच्या पारीत सांजा भरून, पोळ्या लाटून  घ्याव्यात व थोडेसे तूप सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजाव्या.

हा पराठा खायलाही चविष्ट आणि पौष्टिकही असतो

Saturday, 29 July 2017

नारळाचे दूध कसे मिळवाल ?


नारळाचे दूध कसे मिळवाल ?


बाजारात टिनमधे दोन्ही प्रकारचे नारळाचे दूध मिळते.हल्ली बाजारात  नेसले या प्रख्यात  ब्रंडेड कंपनीची  नारळाच्या दूधाची पावडरही मिळते.

मात्र जर नारळाचे दूध घरीच करायचे असेल तर त्या दूधासाठी नारळही बघूनच घ्यावा लागतो. नारळ जर फार कोवळा असेल तर त्यातून दूधच निघत नाही आणि नारळ जर फारच जून झाला असेल तरी त्यातून दूध निघत नाही. अर्थात नारळ कसा आहे  हे फोडल्यावरच कळते.
ज्या नारळाचे खोबरे ओलसर असते त्या नारळाचे दूध चांगले निघते.
नारळ खोवून त्याचा चव घ्यायचा. उत्तम नारळाचे दूध चव / खोवलेले खोबरे नुसत्या हाताने पिळूनही  निघते, पण तितका ताजा नारळ आजकाल बाजारात येत नाही.
या चवात / खोवलेल्या ओल्या खोबर्‍यात अर्धा कप कोमट पाणी घालून ते मिश्रण मिक्सरमधे घालून वाटायचे. मग ते गाळण्यातून गाळून घ्यायचे व गाळणीवर राहील तो चोथा हाताने पिळून घ्यायचा. हे दूध खूपच दाट असते. बर्‍याच पाककृतीत नारळाचे दोन प्रकारचे दूध वापरायचे असते. त्यासाठीच हे घट्ट दूध वेगळेच ठेवायचे.
आता त्या गालांनीवर राहिलेल्या खोबर्‍याच्या चोथ्यात एक कपभर कोमट पाणी घालुन परत मिक्सरवर वाटायचे, असे आणखी एकदा करायचे. यावेळी निघते ते पातळ दूध.
साधारणपणे पदार्थ शिजताना पातळ दुध घालतात आणि पदार्थ शिजला कि दाट दूध घालतात. दाट दूध घातल्यावर पदार्थ उकळायचा नसतो.
सोलकढी सारख्या प्रकारात, दोन्ही प्रकारचे दूध एकत्र करायचे असते.
दाट दूध फ्रीजमधे ठेवले तर त्यावर सायीचा थर जमा होतो. त्याला नारळाचे (कोकोनट) क्रीम म्हणतात. या दुधात शिकरण सुद्धा करता येते.