Friday 4 April 2014

कणकेचा गोड शिरा

कणकेचा गोड शिरा


साहित्य : एक वाटी भरून गव्हाची जाडसर कणिक , एक सपाट वाटी भरून साखर , अर्धी वाटी साजूक तूप , दोन  कप भरून दूध , आवडीप्रमाणे सुका मेवा (काजू,बदाम,बेदाणे,चारोळया व  पिस्ता यांचे काप),किसलेले बारीक सुके खोबरे
कृती : प्रथम गॅसवर एका कढईत साजूक तूप गरम करून घ्यावे ,तूप गरम झाले कि त्यात कणिक घालावी व चांगली खरपूस वास येईपर्यंत सोनेरी रंगावर भाजून व परतून घ्यावी.मिश्रण जास्त कोरडे वाटल्यास अजून थोडे तूप घालावे. (कणीक योग्य प्रमाणात भाजली गेली नाही तर शिरा चिकट व गिच्च गोळा होतो व चावही बिघडण्याची शक्यता असते, म्हणूनच जास्त भाजणे) भाजून कणिक चांगली लालसर झाली कि त्यात दोन कप भरून दूध घालावे व लगेचच साखर घालावी व चांगले परतून घ्या व लगेचच  सुका मेवा घालून पुन्हा परतून घ्या.शिरा भांड्याला खाली चिटकू शकतो म्हणूनच सतत परतत रहावे. दूध घातल्यानंतर साधारण ५ मिनिटातच कणिक आळायला लागते म्हणजेच समजावे कि  शिरा तयार झालेला आहे लगेच गॅस बंद करून गरमागरम शिरा सर्व्ह करावा .




Thursday 3 April 2014

मेथी मलई मटर पनीर


मेथी मलई मटर पनीर



साहित्य : २ कोवळ्या ताज्या मेथीच्या जुडया(निवडून,स्वच्छ धुवून व चिरून),१०० ग्राम खवा,२०० ग्राम फ्रेश क्रीम,१ कप दूध,२०० ग्राम हिरवा मटार,१०० गाम पनीरचे छोटे छोटे तुकडे २ मोठे कांदे (बारीक चिरून),१ मोठा चमचा टोमॅटो प्यूरी,छोटा अर्धा चमचा गरम मसाला, छोटा अर्धा चमचा हळद,२ मोठे चमचे तेल,चवीनुसार मीठ
कृती : ओला हिरवा मटार व बारीक चिरलेली मेथी सळसळत्या उकळत्या पाण्यात २ मिनिटे घालून उपसून घ्या. एका कढईत तेल घालून गॅसवर ठेवा व त्यात बारीक चिरलेला कांदा घाला व सोनेरी गुलाबी रंगावर परतून घ्या नंतर त्यात हळद घालून हलवा,मग त्यात प्रथम मटार घालून हलवा व नंतर खवा कुस्करून घाला व हलवा ,नंतर टोमॅटो प्युरी घालून हलवा व अखेरीस दूध घाला व शिजवत ठेवा. १-२ उकळ्या येऊन गेल्यावर त्यात उकळत्या पाण्यातून काढून घेतलेली मेथी घालून २-३ मिनिटे शिजवूत घेतल्यावर गरम मसाला घालून हलवा व कढई खाली उतरवून ५ मिनिटे झाकून ठेवा॰
सर्व्ह करतेवेळी फेटलेले फ्रेश क्रीम घालून सर्व्ह करा.


Wednesday 2 April 2014

खाराच्या मिरच्या (मिरची लोणचे)

खाराच्या मिरच्या (मिरची लोणचे)




साहित्य  :  अर्धा किलो जाड मोठ्या कमी तिखट असलेल्या मिरच्या , १००ग्राम मोहरीची डाळ , एक वाटी मीठ , केप्र किंवा प्रवीणचा मिरची मसाला एक पाकीट , एक डझन लिंबे , ५० ग्राम आले , एक वाटी तेल.फोडणीसाठी मोहोरी, हळद,हिंग व मेथीची पूड

कृती  : प्रथम मिरच्या धुवून व स्वच्छ कापडाने  पुसून कोरड्या करून घ्याव्यात व विळीवर चिरून त्यांचे बारीक तुकडे करून घ्या. चार लिंबांच्या फोडी करून घ्या.आल्याचे विळीवर किंवा सुरीने अतिशय बारीक तुकडे करून घ्या. मोहोरीची डाळ तेलात चांगली फेटून घ्या.
एका परातीत किंवा स्टीलच्या थाळ्यात मिरचयांचे तुकडे,आल्याचे तुकडे,लिंबाच्या फोडी , फेटलेली मोहोरीची डाळ , मिरची मसाला व मीठ घालून ते मिश्रण मोठ्या चमच्याने हलवून चांगले एकजीव करून घ्या व एका स्वच्छा व कोरड्या काचेच्या किंवा चीनी मातीच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरा. गॅसवर कढईत वाटीभर  तेल घेऊन चांगले कडकडीत तापल्यावर  त्यात मोहोरी,हळद,हिंग व मेथीची पूड घालून फोडणी करून ती थंड झाल्यावर बरणीत भरलेल्या मिरच्यांवर ओता व चमच्याने हलवून बरणी झाकण लावून त्यावर दादरा म्हणून एका स्वच्छ फडक्याने बांधून कपाटात ठेवा. 

दोन तीन दिवसांनंतर बरणी उघडून पुन्हा एकदा चमच्याने हलवून तोंडी लावणे म्हणून खायला द्या. 

Tuesday 1 April 2014

पालक पनीरचे पॅटीस

पालक पनीरचे पॅटीस

साहित्य  :  एक जुडी पालक, एक वाटी पनीरचे बारीक तुकडे , एक वाटी  भरून बारीक चिरलेला कांदा, दोन चमचे हिरवी मिरची-आले पेस्ट, दोन चमचे धने-जिरेपूड, मीठ, साखर, चवीनुसार लिंबाचा रस, बेसन पीठ. 

कृती :  पालक धुऊन गरम पाण्यात घाला. पाच मिनिटांनी बाहेर काढून बारीक चिरुन ठेवा. गॅसवर फ्रायपॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यात मिरची पेस्ट आणि कांदा घालून परता व झाकण ठेवून  एक वाफ येऊ द्या , वाफ आल्यावर पालक घालून पुन्हा एकदा परता. पनीरचे छोटे तुकडे कुस्करून पालकमध्ये मिसळा व हलवा. नंतर धने-जिरे पूड, चवीनुसार लिंबाचा रस, मीठ, साखर घाला. मिश्रण एकजीव करा व गॅस बंद करा. उकडलेले बटाटे, मीठ, बेसनाचे पीठ एकत्र करून मळून गोळा तयार करा. त्याची पारी तयार करून पालक व पनीरचे मिश्रण त्यात भरा. पारीचे तोंड बंद करून ती चपटी करा व ब्रेडक्रममध्ये घोळून घ्या व  तेलात सोनेरी रंगावर तळा. सॉसबरोबर सर्व्ह करा.