Thursday 31 July 2014

खमंग दडपे पोहे

खमंग दडपे पोहे 

साहित्य : दोन वाट्या पातळ पोहे,. चार चमचे रिफाइंड तेल,फोडणीसाठी जिरे.मोहोरी,हळद,हिंग,चवीनुसार मीठ,पिठी साखर व हिरव्या मिरचयांचे तुकडे,बारीक चिरलेली कोथिंबीर,दोन तळणीच्या मसाला भरलेल्या मिरचयांचे तुकडे,१०-१२ कढीपत्त्याची पाने,एक मोठा कांदा चिरून,अर्धी वाटी शेंगदाणे, दोन चमचे दही किंवा लिंबाचा रस,नारळाचा खवलेला चव व एक काकडी व एक टोमॅटो बारीक चिरून.
कृती :  गॅसवर एका कढईमधे तेल तापवून घेऊन त्यात शेंगादाणे तळून घ्यावेत, नंतर त्यातच जिरे ,मोहरी ,हिंग टाकून फोडणी करावी,नंतर कोथिंबीर, कडीपत्ता, कांदा, हिरवी आणि लाल तळणीची मिरची फोडणीत टाकून परतून घ्यावी,
परतल्यानंतर शेवटी त्यात हळद टाकावी.
मग एका स्टीलच्या मोठ्या पातेल्यात पातळ पोहे घेउन त्यावर बारीक चिरलेली काकडी,टोमॅटो,खवलेला ओल्या नारळाचा चव घालून एकदा कालवून घेऊन मग त्यावर ही कढईतील शेंगदाणे व इतर साहित्य घालून परतलेली फोडणी टाकावी,वरून दोन चमचे दही किंवा लिंबाचा रस घालून कालवून घ्यावे व पातेल्यावर एक घट्ट झाकण ठेवावे म्हणजेच ते ५ ते १० मिनिटे दडपून ठेवावे.डिश भरतेवेळी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे खमंग दडपे पोहे सर्व्ह करावेत. 

Wednesday 30 July 2014

पुरण पुरी !!

पुरण पुरी !!!

साहित्य : अर्धा किलो चणा डाळ , अर्धा किलो गुळ , गव्हाचे पिठ , मिठ अर्धा चमचा, सुंठ इलायची जायफळ बडिशेप पावडर एक चमचा
तळण्यासाठी तेल
कृती : चणा डाळ पाणी मिठ घालून कूकरला शिजवून घ्या. त्यात थोडसे अर्धा कप गरम पाणी आणी गुळ घालून मिसळून घ्या. त्यात सुंठ इलायची जायफळ पावडर घालून मिसळून घ्या. त्यात मावेल एवढ गव्हाच पिठ घालून मळून घ्या. पांच मिनिटांनी या पिठाच्या पुर्‍या लाटून तळून घ्या.
या पुर्‍या बासुंदी किंवा आमरस सोबत छान लागतात तसेच त्या चार पाच दिवस छान टिकतातही. पिकनिक किंवा गावी जाताना न्यायला उत्तम !!

Sunday 27 July 2014

मका कणसांच्या दाण्यांची भजी

मका कणसांच्या दाण्यांची भजी 



आज श्रावणमास प्रारंभ ! आजच अमेरिकन स्वीट कॉर्न म्हणजेच मक्याची कोवळी कणसे आणली होती त्याचे दाणे काढून त्याची भजी केली होती म्हणून त्याचा फोटो व रेसिपी येथे देत आहे. 
मका कणसाच्या दाण्यांची भजी 
साहित्य : दोन वाट्या कोवळे अमेरिकन मक्याच्या कणसाचे  दाणे , अर्धी वाटी बारूक रवा, तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे बेसनपीठ , तीन कोशिंबीरीचे मोठे चमचे  भाजणी ,चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट , एक चमचा जिरेपूड ,एक छोटा बारीक चिरलेला कांदा  मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीनुसार मीठ व भजी तळण्यासाठी तेल. 
कृती : मिक्सरवर  मक्याच्या कणसाचे कोवळे दाणे भरडसर वाटून घ्यावेत. (फार पेस्ट करू नये, फक्त अर्धवट मोडले जातील असे वाटावे) , भरडलेल्या दाण्यांत बारीक रवा,भाजणी, चवीनुसार आलें,लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट, जिरेपूड, बेसनपीठ,बारीक चिरलेला कांदा व  बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसारमीठ घालून मिक्स करावे. लागल्यास थोडे पाणी घालून दाटसर पीठ भिजवावे. पीठ पातळ भिजवू नये, चिकटसर असे भिजवावे. गॅसवर एका कढईत तेल गरम करून आच मध्यम ठेवावी. चमच्याने लहान लहान गोळे तेलात घालून भजी तळून घ्यावी.
हिरव्या पुदिन्याच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावी.
विशेष सूचना :
१) जर मक्याचे दाणे जून आहेत असे वाटले तर आधी थोडे वाफवून घ्यावेत.
२बेसन पीठा बरोबर आपण इतर पीठेसुद्धा वापरू शकतो. जसे तांदुळाचे, सोयाबीनचे पीठ. पीठाचे प्रमाण आवडीनुसार कमी-जास्त करू शकतो.
३) जर भजी तेलात फुटत असतील तर थोडे पीठ वाढवावे.

Friday 11 July 2014

रताळ्याची खीर

रताळ्याची खीर

काल गुरुवार १० जुलैला होती आषाढी द्वादशी,म्हणजेच एकादशीचे पारणे ! त्यासाठी आमच्या घराच्या गच्चीवरील मातीविरहीत बागेतून काढलेल्या रताळ्याची गोड खीर उपास सोडण्यासाठी३ केली होती. त्याचाच फोटो व साहित्य आणि कृती आज खाली देत आहे. 

साहित्य : एक मोठे रताळे,वाटीभर साखर,दोन मोठे चमचे साजूक तूप,दोन कप दूध,एक बारीक चमचा वेलची पूड,चार काजू,चार बदाम,चार बेदाणे
कृती : प्रथम रताळे चांगले धुवून घ्या,मग ते किसणीवर किसून घ्या,गॅसवर एका कढईत दोन चमचे साजूक तूप गरम करून घेऊन त्यात रताळयाचा कीस सोनेरी रंगावर परतून घ्या,मग त्यात दोन कप दूध खालून एक उकळी येऊ द्या,मग त्यात एक वाटी साखर घाला, आता त्यात एक बारीक चमचा वेलची पूड व चार काजू आणि चार बदाम तुकडे करून घाला,चार बेदाणेही घाला. रताळयाचा  कीस शिजल्यावर गॅस बंद करा.