Monday, 7 November 2016

कचर्‍यातून फुलवा बगीचा व करा नंदनवन - अर्थात जैविक बगीचा (बायो कल्चर) 
कचर्‍यातून फुलवा बगीचा व करा नंदनवन - अर्थात जैविक बगीचा (बायो कल्चर)

ग्लोबल वार्मिंगच्या विनाशकारी प्रलय संकटापासून समस्त मानवजातीला वाचवण्यासाठी जगभर चालू असलेल्या    “ वसुंधरा बचाव “ चळवळीत सहभागी होऊन इ.सन  २००६ पासून पर्यावरणास पूरक असे अनेक उपक्रम आम्ही उभयतांनी घरी चालू केले. त्यातील  आम्ही चालू केलेला एक अभिनव उपक्रम म्हणजे आमच्या घरातील रोजचा निर्माण होणारा ओला कचरा ( शिळे किंवा खराब झालेले अन्न व भाजीपल्याचा टाकाऊ भाग) महानगरपालिकेच्या कचाकुंडीत न टाकता त्याचा पुर्नवापर करून पर्यावरणास हातभार लागावा या उद्देशाने आम्ही नोव्हेंबर २००९ पासून आमच्या जुन्या घराच्या १४  फूट x १०फूट आकाराच्या गच्चीत,  बायो-कल्चर निर्मिती म्हणजेच जैविक बगीचा फुलवला असून ओल्या कचर्‍यापासून (ह्यामध्ये निर्माल्य,फळांच्या साली व बिया,चहाचा चोथा, कोथिंबीर, पालक,शेपू, मेथी, चाकवत, अंबाडी,माठ,चुका, मुळा,करडई इत्यादि पालेभाज्यांची देठे,शिळे,खरकटे वा आंबलेले अन्न,टाकाऊ धान्य व पोरकिडे झालेले धान्य, कोंडा,बुरशी आलेला पाव, मटाराच्यासाली, बिरड्यांचीसाले, कलिंगड, फणस,केळी,आंबा,संत्रे, मोसंबी, लिंबू इत्यादि फळांच्या साली,मटन व चिकनची हाडे,केसांचे गुंतवळ, नखे,खराब काळा गूळ इत्यादि जैविक विघटन होणारे काहीही ) या बगीच्यात आत्तापर्यंत आम्ही आंबा,पेरु,चिक्कू,चिंच, सीताफळ,डाळिंब,करवंद,आवळा, कलिंगड,अंजीर,पपई,केळी,लिंबू इत्यादी) विविध प्रकारची फळझाडे लावली असून (वर्षाच्या आत त्यांचे नियमित उत्पादनही सुरू झाले आहे.तसेच आम्ही बागेत भाजीपाला (वांगी,टोमॅटो,पालक, मेथी, रताळी,हळद,आले,लसूण,कांदा पात,वालपापडी, पावटा, कोथिंबीर,पुदिना,अळू,शेवगा, हादगा,कोबी,मोहरी, मिरच्या,कार्ली, गवतीचहा, भेंडी, ओवा)लावला असून त्याचेही नियमीत उत्पादन चालू झाले आहे. याखेरीज या जैविक मातीविरहित बागेत आम्ही अनेक जातींची फुलझाडे लावली आहेत (अबोली,मोगरा,गुलाब,शेवंती,जाई,जुई,मदनबाण,कुंद, जास्वंद, झेंडू, निशिगंध,पारीजातक, रातराणी, सोनटक्का, अनंत, अँस्टर,सोनचाफा, ब्रम्हकमळ,डबलमोगरा,हजारी मोगरा, सदाफुली, तगर, ब्राम्हकमळ इत्यादी.) लावलेली असून त्याचे नियमित उत्पादनही  घेत आहोत .सोबत आमच्या जैविक बागेचे काही फोटो नमुन्यादाखल खाली दिलेले आहेत.
या जैविक बगीच्या पद्धतीत कोरडा कचरा उदा. कागद,कांच,धातूचा पत्रा किंवा तार वगळता ज्याचे विघटन होऊ शकते असा घरातील कोणताही नैसर्गिक ओला कचरा अगदी केसांचे गुंतवळ किंवा नखे  आगर मेलेली झुरळे किंवा उंदीर-घुशी सुद्धा टाकू शकता.
बाजारात मिळणारी बायो-कल्चर पावडर म्हणजे एक प्रकारचे ओल्या कचर्‍याचे जलद गतीने विघटन होण्यासाठी आवश्यक असे एक प्रकारचे विरजण आहे. (जसे आपण घरी दुधापासून दही करतांना दुधाला जसे विरजण लावतो तसे)  
विघटन होऊ शकेल असा ओला कचरा उसाचा रस काढून झाल्यावर उरणारी चिपाडे,नारळाच्या शेंदया व करवंट्यांचे बारीक तुकडे,वाळलेला पाला-पाचोळा,विटांचे २  आकारातील तुकडे व बायो-कल्चर पावडर (विरजण) यांचा वापर करून कुंडीत (मातीविरहित) आपण रोपे किंवा झाडे लाऊ शकता. माती वापरलीच तर फक्त एकदाच तीही कुंडीच्या तळाच्या थरातच वापरावी. एकदा कचरा व कल्चर वापरण्यास सुरुवात केली की मध्ये मध्ये पुन्हा पुन्हा मातीचा वापर करू नये.   
कुंडी : कुंडी म्हणून बाजारात मिळणार्‍या मातीच्या आगर प्लास्टिकचा विविध आकाराच्या कुंड्या,पत्र्याचे गोल.चौकोनी आकारातील डबे,ड्रम्स,प्लास्टिकचे डबे,ड्रम्स,थर्मोकोलचे चौकोनी खोके काहीही चालू शकते.माझ्या मते थर्मोकोलचे आयताकृती आकाराचे खोके सर्वात उत्तम ! आजकाल मेडीकलच्या डिस्ट्रिब्युटरकडून / दुकानातून असे रिकामे खोके मिळू शकतात. यात मातीचा वापर नसल्याने व  थर्मोकोल वजनाने हलके असल्याने ज्येष्ठ व्यक्तींना या कुंड्या बागेत हाताळनणे सोपे जाते हे एक महत्वाचे कारण व दुसरे असे की थर्मोकोल हे पाण्याने सडत आगर कुजत नाही,किंवा याचेवर कसलाही रासायनिक परिणाम होत नाही.
कुंडीत रोप लावण्याची पद्धत : ज्या कुंडीत झाड / रोप लावायचे असेल त्यांच्या  तळात  व सर्व बाजूंनी तळा पासून दोन इंच उंचीवर १० मी.मी. आकाराची मध्ये ४ “ अंतर ठेऊन भोके पाडावीत त्यामुळे पाण्याचा व्यवस्थित निचरा होऊन रोपांच्या मुळांना प्राणवायू मिळू शकतो. नारळाच्या शेंड्या,विटांचे तुकडे व ऊसाची चिपाडे यांचेमुळे ओलावा टिकून रहाण्यास मदत होते. प्रथम कुंडीच्या तळाच्या थरात ४ उंचीचा विटांचे छोटे छोटे तुकडे,करवंट्यांचे तुकडे व पाला-पाचोळा किंवा या एकाच थरात वापरायची असेल तर माती यांचा थर देऊन त्यावर एक मूठ बायो-कल्चर पावडर ( विरजण)  पसरून पुन्हा ४ उसाही चिपाडे ,नारळाच्या शेंड्या,भाज्यांची देठे असा थर हाताने दाबून द्यावा व त्यावर पुन्हा एक मूठ बायो-कल्चर (विरजण) पावडर घालावी. याप्रमाणे थरावर थर द्यावे व कुंडी वरुण  मोकळी ठेऊन भरून घ्यावी  व शेवटचा थर भरून झाल्यावर ३ मुठी बायो-कल्चर पावडर पसरावी. भरलेल्या कचर्‍यात मधोमध खड्डा करून बाजारातून आणलेले रोप बाहेरची प्लास्टिकची काळी पिशवी मुळांना धक्का न लावता फाडून टाकून ते रोप बुंध्यासह व मातीसकट त्या खड्ड्यात ठेऊन बाजूला केलेला कचरा पुन्हा वर ओढून घ्यावा. वर एक मूठ निंबोळ्यांची पेंड घालावी. रोज एक वेळ पानी देत जावे. आठ दिवसांनंतर भाजीपाल्याचा कचरा फळांच्या साली,टरफले ,भाज्यांची देठे व शिळे-पाके अन्न घालायला सुरुवात करावी. सुरूवातीस ४-६ महीने तरी कोबी व फ्लौवर याचा पाला टाकू नये.
कचर्यास दुर्गंधी , कचर्‍यातून घाण पाणी , आळया , किंवा कचर्‍यावर माशा असा त्रास / समस्या उद्भवल्यास वरुन आणखी बायो-कल्चर घालावे.
या पद्धतीचे फायदे :  कचर्‍यास कसलीच दुर्गंधी येत नसल्याने ओल्या कचर्‍यामुळे प्रदूषणात होणारी भर टाळता येते. कचरा पाणी झाडात शोषून ठेवत असल्यामुळे पाणी कमी लागते. अन्य कुठल्याच खताची जरुरी लागत नाही. जास्ती तंत्राची जरूरी नसते. एक-दोन दिवस गावाला गेलात तरी काही फरक पडत नाही. मुळांना वाढीस लागणारे अन्न-पाणी  जवळच मिळत असल्याने झाडाची वाढ लवकर होऊन फळे,फुले,भाज्या,शेंगा यांचे उत्पादन मातीच्या तुलनेत लवकर  व मुबलक सुरू होते. ( मला शेवग्याची बी  लावल्यापासून एका वर्षाचे आत शेवग्याच्या शेंगा खाता आल्या)
टीप  : बायो-कल्चर (विरजण)  हे सुरूवातीस फक्त एकदाच वापरायचे लागते ,पुन्हा-पुन्हा वापरावे लागत नाही.
रासायनिक खतांचा वापर टाळावा. किडीसाठी हळदीचे पाणी,तिखटाचे पाणी,कडूलिंबाची पाने घालून उकळून घेतलेले पाणी,तंबाखूचे पाणी यांचा वापर फवारणीसाठी करावा. आपल्या काही शंका असल्यास एकदा प्रत्यक्ष येऊन बाग बघा व शंकाचे निरसन करून घ्या.
बायो-कल्चर पावडर पुणे येथे श्रीमती निर्मला लाठी मोबाइल नं 98508 49870 दूरध्वनी 020 - 2447 4107. यांचेकडे मिळते.
Bio-culture powder is also available online on shopclue , amazon.snapdeal and other sites. Cash on Delivery is also available.
संपर्कासाठी :
सौ. अनिता प्रमोद तांबे व श्री.प्रमोद लक्ष्मण तांबे
दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३ भ्रमणध्वनी : ९७३०९ ८८७११
"श्री स्नेह-सेवा",१४१५,सदाशिव पेठ , रेणुका स्वरूप मेमोरिअल गर्ल्स हायस्कूल शेजारी, एस.पी.कौलेजसमोर, खजिना महालच्या बोळात,पुणे - ४११ ०३०
ई. मेल : pltambe@yahoo.co.in
हे पहा गच्चीवरील मातीविरहित जैविक बागेचे आणखी काही निवडक फोटो