Monday 8 May 2017

ज्वारीचे बिबडे (पापड)



ज्वारीचे बिबडे (पापड)


साहित्य- एक किलो ज्वारी, २०-२५ लसणाच्या पाकळ्या, चार चमचे जिरे, चार चमचे तीळ, दोन वाट्या मीठ ,तिखट पाऊण चमचा.
कृती- ज्वारी तीन दिवस भिजट घालावी. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी चांगली धुवावी व मिक्सरवर दळावी. सकाळी लसूण व जिरे वाटावे. जेवढे वाटलेली ज्वारी असेल त्याच्या दुप्पट पाणी गरम करत ठेवावे.
पाणी उकळल्यावर (घाटा शिजेल अशी पातेली घ्यावी) त्यात मीठ व वाटलेली लसूण, जिरे, तीळ, तिखट घालावे. नंतर वाटलेले ज्वारीचे पीठ हळूहळू सोडावे, पीठ इडली पिठासारखे असावे. ते हलवत राहावे. पिठास बुड-बुडे आल्यासारखे दिसले  की पीठ शिजले असे समजावे. मग पोळपाटावर ओला रुमाल करून त्यावर पळीभर पीठ घालून हाताला पाणी लावून पातळ थापावे व उन्हात एका प्लास्टीकच्या कागदावर तो रुमाल उचलून त्यावर तो पापड हळूच ठेवावा. हे न जमल्यास पळीने प्लास्टीक कागदावर गोल आकारात पसरावे. वाळल्यावर उलटे करून पापड काढावे व परत वाळवावे. तळून- भाजून खावे.

‘पेठ्या’ चे लाडू



पेठ्या चे लाडू


दिल्लीहून येतेवेळी आम्ही आग्र्याला मिळणारा सुप्रसिद्ध  पेठा आणला होता,पण सगळ्यांनाच पेठा आवडतोच असे नाही,त्यामुळे आम्ही उरलेल्या पेठ्यांचे लाडू केले व ते सगळ्यांनाच खूप आवडले. म्हणूनच त्याचीच रेसिपी येथे पोस्ट करत आहे.
साहित्य  : दोन वाट्या पेठा (किसून घ्यावा) ,दोन वाट्या सुके किसलेले खोबरे,अर्धा चमचा विलायची पूड,प्रत्येकी १०-१५ बदाम,काजू व पिस्ते यांचे बारीक केलेले काप
कृती : सुरवातीला पेठा व सुके खोबरे दोन्ही किसून घ्या. किसलेले सुक खोबरं मिक्सर मधून वाटून घ्या. पेठ्याचा कीस व वाटलेले सुक खोबरं मिक्स करा.मग या मिश्रणात वेलची पूड,काजू,पिस्ते, बदाम यांचे बारीक करून ठेवलेले काप मिक्स करून लाडू वळून घ्या. सजावटीसाठी लाडवांवर बदाम किंवा बदामाचे बारीक काप लावा. बनवलेले लाडू अर्धा  तास फ्रिजमध्ये ठेवा, लाडू छान सेट  होतील.
टिप : फ्रिजमध्ये ठेवल्यास हे लाडू पंधरा १०-१५ दिवस छान टिकतात.

कलिंगडाच्या सालींचा ज्यूस (वेलकम ड्रिंक)



कलिंगडाच्या सालींचा ज्यूस (वेलकम ड्रिंक)


साहित्य: ४-५ वाट्या कलिंगडाच्या सालींचे  मध्यम आकाराचे  तुकडे , अर्धी वाटी संत्र्याचा ज्यूस (आवडीप्रमाणे कमी जास्त करावा ,संत्र्यातीलही बिया काढून टाकाव्यात),एक चमचा लिंबाचा रस ,अर्धा चमचा सैंधव (काळं)  मीठ,अर्धा चमचा आल्याचा कीस,एक छोटा चमचा चाट मसाला,बर्फाचे तुकडे (ऐच्छिक)
कृती : मिसरच्या  ब्लेंडरच्या भांड्यात कलिंगडाच्या सालींचे तुकडे,,संत्र्याचा ज्यूस, लिंबाचा रस,काळं सैंधव मीठ, आल्याचा कीस व चाट  मसाला  घालून मिक्सरवर फिरवून ब्लेंड करावे. एकजीव झाले की सर्व्हिंग बाउळ्स किंवा ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे घालून त्यावर ज्यूस ओतावा. आणि गारच सर्व्ह करावा.
टीप  : सर्व्ह करतेवेळी ज्यूसमध्ये सजावटीसाठी कलिंगडाचे बारीक तुकडे वरून टाकावे.