Sunday 8 April 2018

मिश्र डाळींचा “अडई” डोसा

मिश्र डाळींचा “अडई डोसा



अडई डोसा हा एक दाक्षिणात्य डोसा प्रकार आहे.हा खास करून तामिळनाडू राज्यात जास्त प्रमाणात केला जातो.अतिशय पौष्टीक असा हा डोसा करायला फारच सोपा आहे व बिघडण्याचा धोका कमी.
साहीत्य  : दोन वाट्या जाड तांदूळ ,एक वाटी उडदाची डाळ,प्रत्येकी अर्धी वाटी चणा डाळ,तुरीची डाळ,मुगाची डाळ व मसुराची डाळ, चवीनुसार ४-५ लाल सुक्या ब्याडगी मिरच्या ,एक चमचा मेथी दाणे,मूठभर बारीक चिरलेला  कांदा व कोथंबिर,एक इंच आल्याचा तुकडा  बारीक चिरून,१०-१२ कढीपत्याची पाने बारीक चिरून,चवीनुसार मीठ व जरुरीप्रमाणे तेल

कृती  : सगळ्यात आगोदर जाड तांदुळ व सगळ्या डाळी स्वच्छ निवडून धुवून चार ते पाच आधी तास भिजत घाला.डाळीमधे भिजायला घालतेवेळीच त्यात सुक्या लाल मिरच्या व मेथी दाणे  घाला.फक्त तांदुळ मात्रवेगळ्या भांड्यात भिजत घाला.(बाकी सर्व डाळी एकत्रच टाका)
चार-पाच तास भिजवून घेतल्यावर डाळी व तांदळामधील पाणी निथळून काढा आणि मिक्सरवर वाटून घ्या.वाटताना गरज वाटली तर डाळीतून काढलेलेच पाणी थोडे थोडे वापरा.
मिश्रण फार घट्ट अथवा पातळ असू नये.
नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून घेऊन त्यात सर्व मसाला व चवीनुसार मिठ घालून हलवावे.
आता तव्याला तेलाचे ब्रशिंग करून गरम तव्यावर डावाने डोसा घालून थोडा पसरून घ्या वर एक ताट झाकण ठेवून वाफ आणा व परत सगळीकडून थोडे तेल सोडून उलट बाजूने जरा भाजा.हे डोसे तसे जाडसरच असतात.
तयार डोसा नारळाची चटणी ,सांबार किवा पुदीना चटणी आवडीनुसार कशा बरोबरही सर्व्ह करा छानच  लागतो. हा डोसा गरम असतांना चटणी किंवा सांबार नसतांना नुसताही छान लागतो.
टीप:- या अडईडोश्याला नेहमीसारखे पीठ आंबवण्याची किंवा फुगण्याची गरज नसते.
या डोश्यांसाठी तुम्ही तुमच्या  आवडीनुसार डाळींचे प्रमाण कमी-जास्त घेऊ शकता.

No comments:

Post a Comment